आजीचे घड्याळ
आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि ते कुठे अजुनि हे नाही कुणा ठाऊक,
त्याची टिक् टिक् चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देइ न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते !
“अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,”
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी,
साडेपाचहि वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी,
“बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, ऊठ की !”
ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनिया सकाळ न मुळी पत्ता कधी लागता !
“आली ओटिवरी उन्हे बघ !” म्हणे आजी, “दहा वाजले !
जा जा लौकर !” कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.
खेळाच्या अगदी भरात गढ़नी जाता आम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आतुनी
बोले, “खेळ पुरे, घरात परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येऊन !”
सांगे वेळ, तशाच वार-तिथिही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला त्यातुनी !
मौजेचे असते घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !
-केशवकुमार (प्र. के. अत्रे)