संत भक्त मुक्ताबाई
संत मुक्ताबाई या अतिशय लहान वयातच वैचारिक दृष्टीने अतिशय प्रगल्भ अशा संत होत्या. त्या महान अशा तीन भावांच्या लहान बहिणी होत्या. त्यांचे भाऊ म्हणजे सर्वात प्रसिद्ध असे ज्ञानदेव महाराज, संत निवृत्तीनाथ, महाराज संत सोपानदेव महाराज. अशा या भावांची बहीण सुद्धा अगदी त्यांच्यासारखीच, अतिशय दिव्य तेजस्वी आत्मिक उन्नती मध्ये परिपूर्ण असलेली अशी- “संत मुक्ताबाई.”
जन्म व जन्म ठिकाण
संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे इ .स. सन 1279 मध्ये झाला. संत मुक्ताबाई “मुक्ताई” या नावाने सुद्धा ओळखल्या जातात. त्यांचे बालपण सामाजिक दुःखात गेले. समाजाने त्यांच्या कुटुंबाला वाळीट टाकले होते. त्यांच्या आई-वडिलांना देह दंड दिला होता त्यामुळे अतिशय लहान वयात संत मुक्ताबाई आपल्या मोठ्या भावांची माता बनवून घर सांभाळू लागल्या. म्हणजे त्या अतिशय लहान वयातच गृहिणी झाल्या. आपल्या भावांसाठी जेवण तयार करत होत्या. रोज स्वयंपाक करायचा व घर स्वच्छ ठेवून सांभाळायचं, हे काम त्या लहान वयापासूनच करू लागल्या. एकदा तर त्यांना मांडे बनवायचे होते. व त्यांच्या घरी तवा नव्हता, तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मांडे बनविले. तसेच ज्ञानेश्वर महाराज एकदा रागावून बसले होते व आपली पर्णकुटी बंद करून स्वतःला कोंडून घेतले होते. तेव्हा “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” अभंग त्यांनी गाऊन ज्ञानेश्वरांचा राग दूर केला होता. सोपान देवांच्या प्रकृती बद्दलही त्या नेहमी काळजी घेत होत्या, कारण ते फार भावुक होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत असे. अशा प्रकारे ते त्या आपल्या मोठ्या भावांना लहान बाळाप्रमाणे सांभाळत होत्या. काळजी घेत होत्या. त्यांच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी पोषक वातावरण आपल्या लहानशा घरात ठेवत होत्या. लहान वयातच त्या प्रगल्भ झाल्या होत्या.

संत मुक्ताबाईचे ताटीचे अभंग

एकूण 42 अभंग मुक्ताबाईने ताटीचे रचले, हे ताटीचे अभंग अतिशय प्रसिद्ध आहे. हे सहजगतीने त्यांच्या मुखातून निघाले त्यावेळचा प्रसंग म्हणजे— त्यांचे भाऊ ज्ञानेश्वर महाराज हे एकदा निर्दयी समाजावर अतिशय रागावून, ताटीचा दरवाजा आतून बंद करून ठेवला होता. स्वतःला कोंडून ठेवले होते. सर्वांनी आवाज दिल्यानंतरही ज्ञानेश्वर ताटी उघडत नव्हते. सगळ्यांनी विनंती केली तरी पण ते मानत नव्हते. तेव्हा छोट्या मुक्ताबाईंनी “विनवणी” करून हा अभंग रचला. या अभंगांमध्ये वर्णन आहे की हे श्री ज्ञानेश्वरा आदिनाथांपासून गहिरींनी नाथांकडे आणि त्यांच्याकडून निवृत्तीनाथांकडे व त्याच्याकडून आपल्याकडे व मग सोपान देवाकडे मग मजकडे ज्ञान संप्रदायाची शिकवण आहे. आपल्या “घराण्याचे मोठेपण” व “योगी-पण” माझे(मी)स्मरण करून दिले आहे. जो जनांचे अपराध सहन करतो, तो योगी. तुम्ही योगी आहात,तेव्हा आपण रागावू नये. विश्व जरी आपल्यावर रागावले तरी आपण, थंडपणा घेऊन शितलता मनामध्ये भरावी. क्रोधाग्नीला, थंड जलाने भिजवून टाकावे. लोकांच्या शब्दरूपी शास्त्राने जरी त्रास झाला, तरी चांगला उद्देश मान्य करायचा. अशा शब्दात समजवताना मुक्ताच्या बोलण्याने/ शब्दाने शब्दांचे अक्षरशः अभंग झालेत.तेच हे ताटीचे अभंग आहेत. हे सर्व अभंग अतिशय प्रसिद्ध झाले.
तिने ज्ञानेश्वरांना अतिशय प्रेमाने सांगितले आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचे आपण दुःख करू नये. आपली जीभ आपल्या दाताखाली आली म्हणून लगेच काही आपण दात पाडून टाकत नाही. परिस्थिती समोर तर, तर लोखंडाचे चणे खावे लागतात. हाल अपेष्टा सहन करावे लागतात. अपमान सहन करावे लागतात. अभंग खालील प्रमाणे आहेत.
योगी पावन मनाचा l साहे अपराध जनांचा l विश्व रागे झाले वन्ही l संती सुखे व्हावे पाणी l
शब्द शस्त्रे झाले क्लेश l संती मानावा उपदेश l विश्वपट ब्रह्मदोरा l ताटी उघडा ज्ञानेश्वरा ll
हा अभंग ऐकल्यावर ज्ञानेश्वर महाराजांचा आत्मकलेश दूर झाला. त्यांची क्रोधाग्नि हळूहळू थंड होऊन, विझली. त्यांना आपल्या लहान बहिणीचे अभंग ऐकून, तिचा उद्देश ऐकून अतिशय समाधान वाटले. तिची प्रगल्भता पाहून ते आनंदी झाले. व ताटीचे दार आनंदाने उघडून बाहेर आले.
मुक्ताईची मांड्यांची गोष्ट

आपल्या स्वतःच्या प्रगल्भपणातूनच त्यांनी अध्यात्मिकता साधली व त्यातून अतिशय परखडपणे, पण मार्मिकपणे अभंग रचले. त्यांनी रचलेले टाटीचे अभंग अतिशय प्रसिद्ध आहेत. आपल्या भावांसाठी मुक्ताबाईंना एकदा मांडे तयार करायचे होते, परंतु मातीचे खापर आणण्यासाठी त्या कुंभारवाडयात गेल्या तेव्हा, विसोबा चाटी हा त्या गावचा प्रमुख होता. याने कुंभारांना मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये. असे गावात टाकीद देऊन ठेवले होते. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. तिचा हिरमुसलेला चेहरा बघून ज्ञानेश्वरांनी योग बाळाने त्यांची पाठ तापवून मुक्ताबाईला पाठीवर मांडे बांधण्यात व भाजण्यास सांगितले. ज्ञानेश्वरांनी ज्या चमत्कारिकपणे, योग-बळाने :आपली पाठ गरम केली व मुक्ताईने मांडे भाजले. हे पाहून विसोबा, स्वतःहून संवाद साधत ज्ञानेश्वरांना शरण आलेत. संत ज्ञानेश्वरांच्या आध्यात्मिक उन्नती बद्दल ते दिपून गेलेत. त्यांनी मुक्ताईने भागलेले मांडे “प्रसाद” म्हणून खाण्यासाठी मागितले. त्यावर मुक्ताईने त्यांना “खेचर-पक्षी” असे संबोधित केले. तेव्हापासून तेच नाव त्यांनी धारण केले. ‘विसोबा चाटीचे, विसोबा खेचर बनले’ व विसोबा खेचर असेच त्यांचे नाव प्रसिद्ध झाले.
मुक्ताबाई वर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झाला होता. त्यानंतर त्यांना अमृतसंजवनीची प्राप्ती झाली.
पांडुरंग संवाद

तात आणि माता गेलीसे येथून । तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा ।
निवृत्ती ज्ञानदेव कोरांन्नाचे अन्न। सांभाळी सोपान मजलागी ।
तुझ्या योगे हरी कामियेला काय……..
अतिशय दुःखा मधून हा अभंग त्यांच्या मुखातून उद्गत झाला. आई-वडिलांच्या वियोगात मन सुंन्न झाले होते. पांडुरंग- विठ्ठला शिवाय कोणताच आधार नव्हता. कारण त्यांचे आई-वडील विठ्ठल पंत व रुक्मिणीबाई यांना, निर्दय समाजाने “प्रायःचित्तासाठी” म्हणून देह त्यागाची शिक्षा दिली. माता-पितांच्या देह त्यागानंतर, या लहान मुलांना, अतिशय त्रास लोकांनी दिला. पण आत्मबलाच्या तेजाने ही भावंडे समाजाचा त्रास सहन करूनही समाजासाठीच जगत होती.
हळूहळू ते सर्व इतक्या समर्थपणे ते जगू लागले. व लोकांना त्यांचा बोध कळू लागला. ही सर्व जबाबदारी छोट्या मुक्तांईनी सांभाळली. म्हणजे समाज व आपले कुटुंब व गावातील नागरिक यांना त्यांनी अतिशय लहान वयात आत्मज्ञान दिले. सर्वांची ती, जणू ती माऊली झाली. त्यामुळे कोवळ्या वयात,अगदी खेळण्याबागाच्या वयात ती अतिशय अतिशय शोषिक समंजस व गंभीर बनली. एकदा अशाच वेळेतील वरील अभंग गाईला त्यामध्ये त्या “हरी-नाम-योग” सांगत असून, त्यातूनच आपले दुःख विसरण्याचा प्रयत्न करत आहे.
चांगदेव भेट
ईश्वराच्या कृपेने संत मुक्ताईं च्या हातून विश्व-उद्धाराचेच कार्य घडणार होते. हे पूर्णपणे सत्य आहे. त्यामुळेच चांगदेव-योगी चांगले अतिशय मोठे तपस्वी असूनही, त्यांनी मुक्ताईला गुरु मानले. यापूर्वी त्यांनी गुरु केला नसल्यामुळे त्यांना ईश्वर दर्शन झाले नव्हते. तेव्हा मुक्ताईने त्यांना अनुग्रह देऊन शिष्य बनवले. तेव्हा त्यांना परमपद प्राप्ती झाली. त्यांचे वय भरपूर होते. म्हणजे चौदाशे वर्षाचे आयुष्य त्यांचे होते असे म्हणतात. तर मुक्ताई फक्त आठ वर्षाचे वय होते. म्हणूनच खालील अभंग प्रसिद्ध झाला आहे.
आठ वर्षाचे मुक्ताईl चौदाशे वर्षाच्या चांगदेवांचीl
आत्मवृत्त बनलीl चांगदेव म्हणतात मुक्ताई करे लिहिले अंजन
चांगदेवांचे मंदिर जळगाव जिल्ह्यातील चांगदेव गावी आहे. हे गाव सावदा रेल्वे स्टेशन पासून सुमारे आठ किलोमीटर दूर तापी व पूर्णा नद्यांचा संगमावर बसले आहे. मंदिर दगडांमध्ये बांधलेले आहे. हे नाथपंथी कवी व संत होते. योग मार्गात ते प्रवीण होते. त्याच योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्ष जगले. अशी मान्यता प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली व योग पुरुषोत्तम बनले. तरी पण आत्मज्ञानाची व गुरुकृपेची कमतरता त्यांच्यात होती.
अतिशय लहान वयातील संत ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताबाईंची कीर्ती त्यांच्या कानावर पडली. तेव्हा त्यांच्या भेटीची उत्कंठा त्यांना लागली. त्यांनी कोरे पत्र पाठवून भेटीचा संदेश भावंडांना दिला. याच पत्राचे उत्तर ज्ञानेश्वरांनी, निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून लिहिलेले. त्याला “चांगदेव-पासष्टी” म्हणून प्रसिद्धी
मिळाली आहे. पुढे त्यांनी संत मुक्ताबाईंना आपले गुरु मानले. मुक्ताई संत मुक्ताई वयाने लहान असली तरी त्यांची मानसिक उन्नती व आत्मिक उन्नती बघून त्यांना गुरु मानले. अतिशय दीर्घकाळ जीवन जगलेले संत चांगदेव महाराज “मोक्ष-पद” पोहोचले. ह्या चारही भावंडांमुळे त्यांचा अहंकार जाऊन ते अत्यंत शांत व पवित्र झाले.
ज्ञानबोध ग्रंथ
संत मुक्ताईने ज्ञानबोध या प्रसिद्ध ग्रंथाची रचना केलेली आहे. मुक्ताईने लिहिलेल्या अभंगात व काव्यात तिच्या जीवनाचे व प्रतिभेचे अनेक पैलू उठून दिसतात संत मुक्ताई यांना निवृत्तीनाथांनी वेळेत सावध केले. परखडपणा योग व अध्यात्माची उंची तसेच अनेक साक्षात्काराचे पडसाद त्यांच्या बोलण्यातून उमटतात. मुंगी उडाली आकाशी तिने गेलेले सूर्याशी हे अतिशय मार्मिक असे तिचे अभंग वचन आहे हे तिला स्वतःलाही लागू पडते वयाच्या मनाने तिच्या ज्ञानाच्या कक्षा अफाट होत्या. विद्वान अशा तिन्ही भावांची बहीण म्हणून परिचय असला तरी संत मुक्ताई चे स्वतःचे असे व्यक्तिमत्व होते. अनेक गुढ गोष्टी त्यांनी स्पष्ट व परखडपणे सांगितल्या आहेत. ज्ञानदेवांनी पत्ररूपाने चांगदेवांना उपदेश केला. या पत्रालाच चांगदेव पासष्टी म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. त्याचा अर्थ संत मुक्ताई यांनी चांगदेव महाराजांना समजावून सांगितला. तेव्हा चांगदेव हे मुक्ताबाईचे पहिले शिष्य झाले. त्यांच्या अभंगात कळत नकळ सर्वांसाठी उपदेश आहे. त्यांच्या अभंगातून सर्वांच्या जीवनाच्या अनुषंगाने उल्लेख आढळतो. हा उल्लेख अतिशय मार्मिक आहे.
मुंगी उडाली आकाशीं l तिणें गिळीलें सूर्याशीं ll1ll
थोर नवलाव जाहला l वांझे पुत्र प्रसवला ll2ll
विंचू पातळाशी जाय l शेष माथां वंदी पाय ll3ll
माशी व्याली घार झाली l देखोन मुक्ताई हांसली ll4ll
या अभंगात मुंगी म्हणजे सामान्य जीव आणि सूर्य म्हणजे परमात्मा. अर्थात सामान्य जीव जेव्हा ईश्वराशी एकरूप होतो. तेव्हा तो परमात्मा स्वरूपच बनतो. पुत्र प्रसव म्हणजे, अशक्य गोष्ट शक्य झाली. तसेच छोट्याशा माशीचे पिल्ले हे घार बनले व भरारी घेऊ लागले. अश्या गुढ व अशक्य गोष्टी, मनुष्य जेव्हा ईश्वराशी एकरूप होते, तेव्हा घडतात. म्हणजेच चमत्कार घडतात. हा अभंग शब्दशः अर्थ घेण्याचा नाही तर, त्याचा आध्यात्मिक व प्रतीकात्मक अर्थ खूप खोल खोल आहे.
सर्वसाधारण माणसाने जर योग्य प्रकारे साधना केली, तर तो स्वतःच्या अज्ञानावर मात करून ईश्वराशी एकरूप होऊ शकतो. म्हणजे तो सूर्याप्रमाणे प्रकाशमान होऊ शकतो. हाच मुख्य उपदेश या अभंगातून आहे. त्यांच्या अभंगातून परखड उपदेश व तत्वज्ञान दोन्हीही स्पष्टपणे सामान्य माणसाला कळते. अशा या कमी वयाच्या संत मुक्ताबाई म्हणजे मूर्ती लहान व कीर्ती महान होय.
