II श्री चैत्रगौरी प्रसन्न II
माझ्या प्रिय मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या अमृतमय शुभेच्छा!
आज हिंदू नववर्षाचा आरंभ आहे. हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिची म्हणजेच गुढीपाडवा हा एक त्यापैकीच शुभ मुहूर्त आहे. पुराणातील कथांनुसार ब्रह्मदेवाने सुद्धा सृष्टीची रचना याच दिवशी केली होती. हा दिवस नाविन्याचा, आनंदाचा व विजयाचा आहे.
गुढीपाडव्याला काय करावे?
- सर्वप्रथम घर, अंगण, परिसर व वाहनांची स्वच्छता करावी.
- अंगणात स्वच्छता करून तुळशीजवळ सुंदर रांगोळी काढावी तसेच बाजूला चित्रांगण रांगोळी चे रेखाटन करावे.
- नवीन वेळूला रंगीत सुंदर वस्त्र परिधान करून तांब्याचे किंवा स्टीलच्या भांड्याला कलशाप्रमाणे ठेवून कडूनिंब आंबा यांचे पान व डहाळे यांनी सजावे तसेच साखरेची गाठी माळा व फुलांचे माळा याने सजवून विधीपूर्वक पूजा करून उंच स्थानावर तिला विराजमान करावे.
- वर्षाच्या पहिल्याच दिवशी आरोग्यासाठी कडुनिंबाचे पान गूळ व चिंच यांचे मिश्रण करून चटणी भोजनात असते.
- एकंदरीत वर्षाचा पहिला दिवस म्हणून, तसेच जीवनातील सुखदुःख व संतुलित आरोग्यासाठी व विजयासाठी हा सण साजरा केला जातो.
चित्रांगत रांगोळी म्हणजे काय?
आपण चैत्रांगणाच्या रांगोळी बद्दलची माहिती समजून घेऊया.
या रांगोळी मध्ये एकंदरीत 64 शुभचिन्ह आहे ही रांगोळी समृद्धी सुख सकारात्मक ऊर्जा आणि चैत्रगौरीच्या स्वागताचे प्रतीक मानली जाते तसेच ही 64 कलांचे प्रतिनिधित्व करते.
चैत्रांगण रांगोळी बद्दल सविस्तर माहिती:
1)अर्थ: “चैत्र” मराठी वर्षाचा (पहिला महिना) आणि आंगण म्हणजे (अंगण) या शब्दांवरून (चैत्रांगण) हा शब्द रुढ झाला आहे. तसेच ही 64 कला आणि शुभ चिन्हांची कलात्मक मांडणी आहे ती घरासमोरील अंगणात मांडणी करून शुशोभित करतात. या चिन्हांचा खास असा अर्थ व महत्त्व आहे.
2)वेळ व कालावधी:
ही रांगोळी प्रामुख्याने चैत्र शुक्ल प्रतिपदेला (गुढीपाडवा) किंवा चैत्रगौरी पूजनाच्या वेळी काढली जाते. चैत्र महिन्यातील इतर दिवशीही ती काढतात.
3) महत्त्वाचे चिन्हे: या रांगोळी मध्ये सामान्यतः खालील प्रमुख चिन्हे असतात. उदाहरणार्थ: स्वस्तिक, कलश, तुलसी, चंद्र, सूर्य, कमळ इत्यादी पवित्र चिन्हे रांगोळीने काढतात.
4) मध्यभागी तेजस्वी सूर्य आणि शितल ता देणारा चंद्र यांचे चिन्ह रांगोळ्या रांगोळी मध्यभागी असते.
5)सांस्कृतिक महत्त्व: मराठीतील सांस्कृतिक महत्त्व या चित्रांगण रांगोळी मध्ये दिसून येते सुख-समृद्धी आणि चैतन्याचे प्रतीक या रांगोळीला मानले जाते तसेच हिंदू परंपरेतील 64 कलांचे प्रतीक म्हणूनही ही रांगोळी प्रसिद्ध आहे या महिन्यात ही रांगोळी काढणे म्हणजे सुरुवातीलाच पवित्र चिन्हांची पूजा व स्मरण करणे होय त्यामुळे आपण वाईट शक्तींपासून दूर राहू शकतो अशी श्रद्धा आहे
6) कशी काढतात गेरू म्हणजे एक प्रकारची लाल माती लावून अंगण सारवले जाते आणि त्यावर पांढऱ्या रंगाने हे 64 ठिपके किंवा चिन्हे किंवा रांगोळी काढली जाते. ही परंपरा आजही ग्रामीण व शहरी भागात चैत्रगौरीच्या पूजनच्या वेळी जपली जाते.
चैत्रगौरी उत्सव म्हणजे काय?
होळी पौर्णिमा झाल्यानंतर मराठी माणसाला वेध लागतात, ते नूतन वर्षाचे! म्हणजे, चैत्र वर्षाचे! हे नूतन वर्ष “चैत्र-शुद्ध प्रतिपदेला” नवीन मराठी वर्ष, सुरू होत असते.
चैत्र महिन्यामध्ये देवीचे घरा-घरात लाडक्या माहेरवाशीनीच्या रूपामध्येच आगमन होते. मोठ्या हौसेने चैत्रगौरीचा महिन्याभरासाठी “उत्सव” करतात. चैत्र-गौरी माहेरवाशींनीच्या रूपात घराघरात पोहोचल्या जाते. या महिन्यात आपल्या रोजच्या पूजेमधीलच “अन्नपूर्णा-माता” निराळ्या आसनावर बसविले जाते. कोणी तिला पाळण्यात बसवतात व झुला झुलवितात. अन्नपूर्णा मातेला चैत्रगौरी समजून, रोज मनोभावे पूजा करून, गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानिमित्त आजूबाजूच्या चार सुवासिनींना बोलावून हार्दिक स्वागत केले जाते. ही अन्नपूर्णा देवी म्हणजे पार्वती देवीच, आपल्या घरी महिनाभर निवास करते असं समजलं जातं! अशी ही ‘अन्नपूर्णांमाता’ तिचे मूळ रूप “पार्वती-माता” असते. अशी ही पार्वती माता आपल्या घरी महिनाभर वास करते, असे श्रद्धेने समजले जाते.
चैत्रांगण म्हणजे काय?
चैत्रगौरीच्या स्वागतासाठी जी रांगोळी महिनाभर काढली जाते तिला “चैत्रांगण” असे म्हणतात. घरापुढच्या अंगणाला प्रथम शेणाने सारविले जाते. म्हणजे ती जागा पाणी व शेणाने स्वच्छ, प्लेन करतात. शेणाने सारवलेल्या जमिनीवर ही रांगोळी काढली जाते. या रांगोळी रेखाटनाला पारंपारिक महत्त्व आहे.
चैत्रगौरी कोणती देवी आहे?
देवी पार्वतीच्या रूपाला शोभेल असे तिची सर्व सर्व शस्त्रे, शंख, चक्र, गदा, पद्म आणि तिची वाहने गाय, हत्ती कासव, गरुड त्याचप्रमाणे तिची कंगवा, फनी, कुंकवाचा, करंडा आरसा विविध माळा, कंगण, तसेच देवीचे विविध अलंकार अशी सौभाग्य लेणी तसेच सुवासिनीच्या ओटीचे ताट व आपल्या दारचे तुळशी वृंदावन या साऱ्या शुभ चिन्हांची रांगोळी अतिशय सुंदर पद्धतीने चितारलेली असते. ही सर्व आकृती म्हणजेच चित्रांगण होय. ही सर्व शुभचिन्हे माता-पार्वतीसाठी काढलेली असतात. तिलाच गौरी असे म्हणतात. म्हणजे तीच “चैत्रगौरी” असते. गौरीचा मुलगा म्हणजे आपला लाडका श्री गणेश! या चित्रांगण रांगोळ्यांमध्येच गणपती बाप्पाचे रेखाटन, सुद्धा या चैत्रगौरीच्या रांगोळी मध्ये रेखाटले जाते. कारण तो आपल्या आईला घरी न्यायला आलेला आहे. अशी छानशी कल्पना आहे.
असं या आपल्या माहेरवाशिणीच महिनाभर कोड कौतुक करून, मग चैत्र महिना संपला की वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया) या दिवशी अन्नपूर्णा मातेला रोजच्यासारखी नियमित पूजा करून, परत सर्व देवांमध्ये बसून रोजच्यासाठी पूजा केली जाते. अशा प्रकारची “चैत्रगौरी-उत्सवाची” आपल्याला विरासत सहज मिळालेली आहे.
नवीन पिढीला ह्या सगळ्या परंपरेचा व वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे. तेव्हाच आपली परंपरा व संस्कृती टिकून राहणार आहे. महाराष्ट्र हा सण व उत्सवाचा तसेच साधुसंतांचा प्रांत म्हणून ओळखला जातो
चैत्र म्हणजे काय?
चैत्र हा हिंदू पंचांगानुसार मराठी वर्षाचा पहिला महिना आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिना चैत्र प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला सुरू होतो. चैत्र महिना साधारणपणे मार्च आणि एप्रिल महिन्यात येतो. हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेला भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जाते. या महिन्यातील पौर्णिमेला चंद्र “चित्रा-नक्षत्रा”च्या सानिध्यात असतो, म्हणून या मराठी महिन्याला “चैत्र-महिना” असे नाव पडलेले आहे. चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होत असते. चैत्र महिन्यात ऊन हळूहळू कडक होत असते. थंडी कमी झालेली असते वातावरण आल्हाददायक असते. सृष्टीला नवे रूप येऊन उदय होतो. म्हणजे साऱ्यांनाच नवी उमेद आणि नवा उत्सव यातून, फुलत जाणारे उत्सव, समारंभ निरनिराळ्या रंगाच्या आणि वासाच्या फुलांची होत राहणारी वर्षा यामुळे मन आनंदित होते. या काळात मोगरा अतिशय सुगंधाने फुललेला असतो, गुलाब फुललेला असतो. बहुतेक सर्वात झाडांना नवीन नवीन पालवी आलेली असते. त्यामुळे एकूण सगळेच झाडे कवळ्या पानांची असून बहरलेली असतात.
कडुनिंबाला तसेच आंब्याला मोहर आलेला असतो. गुलमोहर अतिशय सुंदर रीतीने बहरलेला असतो संपूर्ण केशरी पिवळा गुलाबी असा हा सुंदर दिसतो आणि गुलमोहरचा झाला झाडाखाली याच फुलांचा सडा जमिनीवर पडलेला असतो तसेच दहाव्याला पण खूप सुंदर पिवळी धमक फुले उमलते उमलतात व ते अतिशय दिमाखात भर उन्हात उभे असते आंबा हातर फळांचा राजा याच काळात मोडतो चैत्रात अनेक ठिकाणी जत्रा भरतात काही ठिकाणी ग्रामदेवतांच्या यात्रा तर कुठे देवीच्या यात्रा तर कुठे रामा साठी रथ व यात्रा राम नवमीला असतो. चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा हा हिंदू पंचांगाप्रमाणे मराठी वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. चैत्र महिन्याची वर्ष प्रतिपदा म्हणजेच मराठी नवीन वर्षाचा आरंभ म्हणजेच गुढीपाडवा या दिवसापासून नवीन शालीवाहन सत्वर सुरू होते.
आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा होणारा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो म्हणून कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम आणि शुभ मानला जातो. जेव्हा दृष्टांचा सहार होतो आणि विजय मिळतो, तेव्हा आनंद व्यक्त करायचे साधन म्हणजे गुढी उभारणे असे असते. श्रीरामांनी बालीचा वध करून समस्त वानर सेनेला याच दिवशी त्याच्या सर्व त्रासापासून वाचविले होते. तसेच रावणाचा सुद्धा वध करून श्रीराम, लक्ष्मण व सीतामाईंना तसेच हनुमानाला सुद्धा घेऊन अयोध्येला परत येत होते तेव्हा या दोन्ही वेळेस नगरातील सर्वांनी गुढ्या तोरणे उभारून अयोध्येमध्ये आनंद व्यक्त केला. व त्यांचे स्वागत केले होते. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा म्हणून ती परंपरा आज सुद्धा आपण सर्वजण उंच गुढी उभारून पाळतो. ही उभारलेली गुढी सूर्यास्ताच्या आधी अक्षदा टाकून काढली जाते. तसेच यावेळी आरती म्हणतात. गुढीला “ब्रह्म-ध्वज” असेही म्हणतात. विजयाचे प्रतीक हे उंच असते म्हणूनच आपण गुढी उंच उभी करतो,आणि गुढीपाडवा हा सण साजरा करतो.
गुढीपाडवा हा दिवस मराठी माणसासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्या दिवशी घराला व अंगणाला सजवून रांगोळ्या काढून दाराला, खिडक्यांना आंब्याच्या पानांची तोरणे बांधून भव्य अशी गुढी उभारली जाते. बरोबरीने गुढीला साखरेची गाठी, चाफ्याच्या फुलांचा हार, तसेच कडुनिंबाची आणि आंब्याची डहाळी बांधली जाते.
या दिवसापासून हवेमध्ये उष्णता वाढत जाते, त्यामुळे कडुनिंबाचे महत्त्व आहे. आयुर्वेदामध्येही कडुनिंबाला अतिशय महत्त्व आहे. पाडव्याच्या दिवशी गुळ आणि जिरे घालून केलेली कडुनिंबाच्या कोवळ्या पानांची चटणी खाण्याची पद्धत आहे. आयुर्वेदानुसार कडुनिंब अतिशय औषधी आहे. तसेच कडुलिंब हा हवा शुद्ध करतो आणि गारवा सुद्धा देतो. म्हणून या दिवसात कडुनिंबाच्या झाडाला फार महत्त्व आहे. तसेच आयुष्यात मागे घडलेल्या कडू गोष्टी विसरून नवीन वर्षाची सुरुवात गोडव्याने करावे म्हणून साखरेची गाठीसुद्धा ठेवतात. तसेच ही गाठी गुढीला बांधतात. घरोघरी गोडाचा स्वयंपाक करून गुढीला नैवेद्य दाखवितात. आंघोळीच्या पाण्यात सुद्धा कडूनिंबाचे पाने आजच्या दिवशी टाकतात. हा सण आंध्र-प्रदेश, कर्नाटक मध्ये “उगादी” या नावाने साजरा केला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टी उत्पन्न करायला सुरुवात केली होती अशी मान्यता आहे. असा उल्लेख पुराणांमध्ये सापडतो म्हणजे हा दिवस सृष्टीच्या उत्पत्तीचा पहिला दिवस मानला जातो. अशाप्रकारे जुन्या व नव्या सृष्टीला जोडणारा गुढीपाडव्याचा सण आपण उत्साह आनंदाने पर्यावरण रक्षणासाठी व आरोग्यासाठी साजरा करू !
