मावळतीला गर्द शेंदरी

Spread the love

मावळतीला गर्द शेंदरी

मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले
जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले
जखम जिवाची हलके हलके भरून यावी
तसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले

घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया
दुःखाचीही अशी लागते अनवट माया
आक्रसताना जग भवतीचे इवले झाले
इवले झाले आणिक मजला घेरित आले

मी दुःखाच्या कुपीत आता मिटते आहे
एक विखारी सुगंध त्याचा लुटते आहे
सुखदुःखाच्या मधली विरता सीमारेषा
गाठ काळजातली अचानक सुटते आहे

जाणीव विरते तरीही उरते अतीत काही
तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही
आतुरवाणी धडधड दाबून हृदयामधली
श्वास आवरून मन कसलीशी चाहुल घेई

हलके हलके उतरत जाते श्वासांची लय
आता नसते भय कसले वा कसला संशय
सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा
मी माझ्यातून सुटते, होते पूर्ण निराशय

कवियत्री – शांता शेळके

Website |  + posts

Spread the love

Leave a Comment

Recommended
प्रीति हवी तर प्रीति हवी तर जीव आधि कर अपुला…
Cresta Posts Box by CP
Index